ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणाची किंमत मराठा समाजाने मोजली – प्रवीण दरेकर

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता विरोधकांनी जोरदार टीका राज्य सरकारवर केली आहे, तसेच या निकालाचे खापर ठाकरे सरकारच्या माथी फोडले आहे.

या संदर्भात बोलताना भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आजचा निकाल अत्यंत दु:खदायक, मराठा समाजाच्या अपेक्षांचा भ्रमनिरास करणारा आहे. याला पूर्णपणे राज्य सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. पहिल्या दिवसापासून कोर्टात वकिलाची उपस्थित नसणे, कागदपत्रं सादर करण्यात दिरंगाई यातून राज्य सरकारचा निष्काळजीपणा दिसला” अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण टिकवण्याची भूमिका घेतली होती. पण सध्याच्या सरकारने पुरक भूमिका घेतली नाही. सरकारच्या निष्काळजीपणाची किंमत मराठा समाजाला मोजावी लागतेय” असे दरेकर म्हणाले. निकालामुळे मराठा समाजामध्ये संतापाची भावना असणं, स्वाभाविक आहे. मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना आता पुढची दिशा ठरवावी लागेल. तसेच सरकार बदलल्यानंतर पहिल्यादिवसापासून निष्काळजीपणा, हेळसांड, कागदपत्र सादर न करण आणि समन्वयाचा अभाव दिसला. या सगळ्याचा परिपाक मराठा समाजाला भोगावा लागतोय” असे दरेकर म्हणाले.

Team Global News Marathi: