ठाकरे सरकारला खोटे ठरवण्याचा डाव, केंद्राने ‘त्या’ बातम्या ठरवल्या खोट्या!

 

नवी दिल्ली | राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक पार पडली असून राज्यात कोरोना लशीचा साठा पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात लशीचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

लशींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात कोरोना लशीचा साठा कमी असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मात्र महारशास्त्रातील प्रसार माध्यमांवर दाखवण्यात येणारे वृत्तपूर्णपणे खोटे आहे, असा खुलासाच केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. आज उपलब्ध झालेल्या अहवालानुसार महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लशीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत. त्याबरोबरच आज लसीच्या 6.35 लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत.

कोविन वेबसाईड उपलब्ध असलेल्या त्यांच्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, 15 ते 17 वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर 2.94 लाख मात्रा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थींना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील दहा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे.

त्याशिवाय राज्याकडे कोविडशील्ड या लशीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे 1.24 कोटी मात्रा आहेत. त्यामुळेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही आणि महाराष्ट्रात शिल्लक असलेल्या साठ्याचे आणि वापर न झालेल्या कोविड लसींच्या मात्रांचे वास्तविक चित्र प्रदर्शित करत नाही, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: