चक्क भाजप नेत्याने भर कार्यकर्त्यांमध्ये अमित शहांची चप्पल उचलली

सत्तेच्या जोरावर वाट्टेल ते केले जाऊ शकते, याचा प्रत्यय देशपातळीवर येत आहे. याचदरम्यान सत्ताधाऱयांपुढे कोण किती वाकू शकतो, याचीही प्रचीती एका घटनेतून आली आहे. तेलंगणातील भाजपच्या नेत्याने केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या चपला उचलल्या.

इतकेच नव्हे तर त्या चपला शहांच्या पायात जाईपर्यंत त्यांनी ‘हात’भार लावला. या प्रकाराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून ही ‘सर्वोत्तम गुलामगिरी’ असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

हैदराबाद दौऱयावर असलेले अमित शहा एका मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन ते मंदिराबाहेर येताच तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी तत्परता दाखवत शहांच्या चपला उचलल्या आणि त्यांच्या पायाजवळ आणून ठेवल्या. तेलंगणा राष्ट्र समितीने या प्रकाराचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यानंतर संजय कुमार यांच्या कृत्याची सोशल मीडियात चांगलीच खिल्ली उडवली गेली आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया निमंत्रक वाय. सतीश रेड्डी यांनी या प्रकाराला ‘सर्वोत्तम गुलामगिरी’ म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामाराव यांनी हा प्रकार म्हणजे ‘तेलंगणासाठी अभिमान’ असल्याचा टोला हाणला आहे. काँग्रेसनेही भाजपमधील या ‘निष्ठे’चा समाचार घेतला आहे.

 

Team Global News Marathi: