‘ती’ समस्या सोडवणारच; आदित्य ठाकरेंची भर उन्हात जमिनीवर बसून चर्चा

 

पालघर | शहापूर तालुक्यातील बिवलवाडी गावासह आसपासच्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच बिवलवाडी गावात ठाकरे आडनावाच्या कुटुंबियांची संख्या अधिक असल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या गावात पाहणी दौऱ्यासाठी गेले असता गावातील महिला यांनी पाणी टंचाईबाबत त्यांना माहिती दिली.

यावेळी तुम्ही पण ठाकरे आणि मी पण..आपण एकत्र काम करून गावाची पाणी समस्या सोडवू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावली धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तो पूर्ण होईपर्यंत या गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी टोपाची बावडी येथून पाणी लिफ्ट करून आणू. त्यासाठी कामाला सुरुवात देखील करण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. शिवाय वीज पुरवठा होत नाही, त्या ठिकाणी सोलर पंप बसवून पाणी येईल. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“ठाकरेंना ठाकरेंचा शब्द” असल्याचे सांगत मंत्री आदित्य ठाकरे यांनी गावातील महिलांना आश्वस्थ केले. यावेळी त्यांनी कसारा घाटात असलेल्या आणि अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या टोपाच्या विहिरीची पाहणी केली. या विहिरीत पाणी साठवून ते लिफ्ट करून गावापर्यंत नेण्यात येणार आहे. शहापूर तालुक्यातील माळ, बिवलवाडी,गोलभन, याठिकाणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

या तालुक्याची पाणी टंचाई कायमची दूर व्हावी म्हणून सरकारच्या मार्फत 316 कोटी रुपयांच्या भावली पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे, परंतु ही योजना पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागतील तो पर्यंत काय उपाय योजना करता येतील, याचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला.

Team Global News Marathi: