ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा उद्योग समूहाचा मदतीचा हात; तुटवड्याच्या काळात केली ‘ही’ मदत –

ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा उद्योग समूहाचा मदतीचा हात; तुटवड्याच्या काळात केली ‘ही’ मदत –

नवी दिल्ली  : देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यासाठी आता टाटा उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे. द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा टाटा उद्योग समूहाने केली आहे. त्यासोबतच दोन दिवसापूर्वी टाटा स्टीलच्या वतीने दररोज ३०० टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणाही करण्यात आली होती. या मदतीबद्दल सर्वस्थरातून टाटा उद्योग समूहाचे कौतुक केले जात आहे. टाटा समूहाच्या मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

‘द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा समूहाकडून २४ क्रायोजेनिक कंटेनर चार्टर्ड फ्लाइट्सने आयात करण्यात येत असून, देशातील ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यास आम्ही मदत करत आहोत.

कोरोनाविरुद्धच्या लढ्याला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑक्सिजनचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.’ असे ट्विट करून टाटा उद्योग समूहाने माहिती दिली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली असून, सगळा देश या संकटाशी झगडत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहाने जनतेच्या मदतीसाठी धाव घेतली असून, त्यांनी द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २४ क्रायोजेनिक कंटेनर आयात करण्याची घोषणा केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: