..तर राज्यसभेसाठी अखेरच्या पाच मिनिटात मतदान करू; बच्चू कडू यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

 

: सध्या राज्याच्या राजकारणात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा दिसून येतोय. आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून हॉटेल मॅनेजमेंट सुरु आहे. तसेच, इतरही काही अपक्ष आमदारांशी महाविकास आघाडी आणि भाजपकडून चर्चा सुरु आहे. अशातच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारनं जे खरेदीचे लक्षांक दिले, ते कमी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारनं खरेदीसाठी हात वर केलेत.

धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्रानं खरेदी सुरू करावी, याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. खरेदी होत नसेल तर, किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असं न झाल्यास आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: