‘…तर मोदी कुठल्या गल्लीत पडलेत, हे कळलं नसतं कुणाला?’

 

शिवसेना फुटली, त्यामागे भाजप असल्याचा आरोप होतोय. त्यावरून आता पुन्हा एकदा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत थेट भाजपवर हल्ला चढवला. बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यातील बैठकीची आठवण सांगत, त्या उपकाराची अशी परतफेड करता आहात का? थेट सवाल सावंतांनी मोदींना केला आहे.

अकोला येथे शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी थेट मोदींना लक्ष्य केलं. इतकंच नाही, तर अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंनाही खडेबोल सुनावलेत. ‘मुंबईच्या महापौर बंगल्यावर बाळासाहेबांनी आडवाणीजींसोबत बैठक बोलावली. त्या बैठकीत साहेब बसले आणि आडवाणी साहेब बसले.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, यावेळी अडवाणींनी सांगितलं की, बाळासाहेबजी, एक गंभीर समस्या आहे. आम्ही ठरवलं आहे की, मोदींना हटवायचं आहे. आठवतं का? अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, राजधर्माचं पालन. त्या पार्श्वभूमीवर मोदींना हटवायचं आहे.

त्यावर बाळासाहेब म्हणाले होते की, काय म्हणता? मोदींना हटवणार? मोदी गेले, तर गुजरात गेला, असं शिवसेनाप्रमुखांचं वाक्य आहे. त्या विधानानंतर आडवाणींनी वाजपेयींना फोन करून सांगितलं की, मोदींना हटवू नका’, असं अरविंद सावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात म्हणाले.

Team Global News Marathi: