त्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करा, भाजपच्या या आमदाराची राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मागणी

त्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करा, भाजपच्या या आमदाराची राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मागणी

आर रिपब्लिक चॅनेलचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी बुधवारी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. या अटकेनंतर राज्यातील विरोधकांनी तसेच केंद्रातील मोदी सरकारने या अटकेचा विरोध दर्शवत आघाडी सरकारवर टीका केली होती. आता त्या पाठोपाठ भाजपा आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीत आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या त्या ९ पोलिसांवर त्वरित कारवाई करून त्यांचे निलंबन करा अशी मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशीही करण्यात यावी याविषयी त्यांनी राज्यपाल यांच्याशी चर्चा देखील केली.

तसेच याच प्रकरणात राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र लिहलं आहे. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी गोस्वामींना मारहाण केली. त्याचं समर्थन देशातील कोणताही नागरिक करु शकत नाही. या ९ पोलिसांना निलंबित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अर्णब यांना अटक करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अर्णब हे पोलिसांशी हुज्जत घालताना व अटकेस मनाई करताना दिसत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: