“सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंचा मला दोनदा फोन आला”

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे तथा त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर दिशा सालियन बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियनचा मृत्यू होऊन आता जवळपास दोन वर्ष उलटली असून नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाच्या मृत्यूसंदर्भात गंभीर दावे केले होते.

दरम्यान, मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तद्पश्चात आपली बाजू मांडण्यासाठी काल(५ मार्च) नारायण राणे आणि नितेश राणे हे मालवणी स्टेशनला हजर झाले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यावर नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मला दोन वेळ फोन केला असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता.

सुशांत आणि दिशाच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आल्याचा दावाही राणेंनी यावेळी केला. यावेळी बोलत असतांना राणे म्हणाले की,’माझ्या जबाबत मी सुरुवातीपासून घडलेली संपूर्ण माहिती दिली. इतकेच नाही तर दिशा सालियानची ८ आणि सुशांतची १३ जून रोजी हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दोनदा फोन आला’, असा दावा राणेंनी केला.

Team Global News Marathi: