सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकरांनी सत्तारांना सुनावले खडेबोल

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.दरम्यान, सत्तार यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर आपले वलय निर्माण केले आहे. सत्तार बेगडी हिंदूत्व घेऊन अशी वक्तव्य करत आहेत, असे पेडणेकर म्हणाल्या.

“सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवून स्वत:चे वलय निर्माण केले आहे. त्यांनी मतदारांशी प्रामाणिकपणा ठेवलेला आहे. सुप्रिया सुळे या आदर्श घेण्यासारख्या आहेत. त्यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले. सत्तार बेगडी हिंदुत्व घेऊन महाराष्ट्रात नाचत आहेत. ते मंत्री आहेत. मात्र ज्या शब्दाचा उच्चार केला जाऊ शकत नाही, असा शब्द त्यांनी वापरला आहे. दोन थोबाडीत मारून क्षमा मागत असाल तर, हे योग्य नाही,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

शिंदे गटातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांचा ‘नटी’ असा उल्लेख केला होता. त्यावरदेखील पेडणेकर यांनी भाष्य केले. “गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत. त्यांना सुषमा अंधारे कोणत्या दृष्टीने नटी वाटल्या. तुमच्या घरातील स्त्रियांनादेखील गुलाबराव असेच म्हणतात का. अंधारे पक्षात येऊन त्यांची भूमिका मांडत आहेत. त्या भूमिकांचा त्रास होतोय, म्हणून त्यांना नटी वगैरे म्हटले जात आहे,” अशी घणाघाती टीका पेडणेकर यांनी केली आहे.

Team Global News Marathi: