31 मेपर्यंत कडक निर्बंध कायम !! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 मेपर्यंत लागू करण्यात आलेले कडक निर्बंध आता 31 मेपर्यंत कायम राहणार आहेत. या निर्बंधांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने पुढील 15 दिवस हे निर्बंध कायम ठेवण्याचा आग्रह सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही याबाबत सकारात्मक असून 15 मेपर्यंत ते अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्याच्या कोरोना स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 14 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. सुरुवातीला या निर्बंधांची मुदत 30 एप्रिलला संपल्यानंतर पुन्हा दोन आठवडय़ांसाठी म्हणजे 15 मे पर्यंत वाढविण्यात आली. आता ही मुदत या आठवडय़ात संपत आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत रुग्णवाढीचा दरही घसरला आहे. त्यामुळे सध्या राज्यात असलेले निर्बंध 31 मे पर्यंत वाढवावेत, असे मत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

निर्बंधांचा सकारात्मक परिणाम

राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी रुग्णांची संख्या 7 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र लॉकडाऊननंतर आता ती 4 लाख 75 हजारापर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर 1.4 आहे तर राज्याचा 0.8 पर्यंत आहे.देशातील 36 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा याबाबत 30 वा क्रमांक आहे. त्यामुळे निर्बंधांचे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, असे राजेश टोपे म्हणाले.

 

मार्गदर्शक सूचना दोन दिवसांत जाहीर होणार

राज्यातील निर्बंध वाढणार की शिथिल होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, निर्बंध शिथिल होण्याची शक्यता फार कमी आहे. 15 मेनंतर जे काही बदल अपेक्षित असतील त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे टोपे यांनी सांगितले.

तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करणार

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे त्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्याची दररोजची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1 हजार 300 मेट्रिक टन आहे. पण सध्या दररोज 1 हजार 800 मेट्रिक टन ऑक्सिजन मागणी आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या शक्यतेमुळे ही मागणी 2 हजार 300 मेट्रिक टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: