कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या: देवेंद्र फडणवीस

 

कठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा, पण, कठोर लॉकडाऊन नको. शिवाय, आता लसीकरणाला वेग द्यायला हवा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केली.

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, महापौर, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने सामान्य नागरिकांचे त्यामुळे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा निर्बंधयुक्त लॉकडाऊन केला पाहिजे. शिवाय, आता लसीकरण उपलब्ध असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नागपुरात केवळ 88 केंद्रांतून सध्या लस दिली जात आहेत, तर ग्रामीण भागात 79 केेंद्रातून दिली जात आहे.

एकट्या नागपूर शहरात प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे किमान 151 लसीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. 60 वर्षांहून अधिक आणि सहव्याधी असलेले 45 वर्षांपेक्षा अधिक हा वयोगट लक्षात घेतला तरी नागपुरात 6,87,000 लसीकरण एप्रिलपूर्वी होणे आवश्यक आहे. आज दिवसाला केवळ 8 हजार ते 10 हजार लसीकरण होत आहे. त्यामुळे उद्दिष्ट गाठायचे असेल तर 40 हजार लसीकरण प्रतिदिवशी होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संघटनांच्या मदतीने ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उघडता आले तर त्यामुळे मोठी मदत होऊ शकेल आणि लक्ष्य लवकर गाठता येईल.

आता दिवसांगणिक कोरोना रूग्णांची सुद्धा संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच कोविड खाटांची आणि कोविड रूग्णालयांची सुद्धा गरज येत्या काळात भासणार आहे. बरेचदा लक्षणे नसलेले व्यक्ती रूग्णालयात दाखल होतात आणि त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तींना खाटा उपलब्ध होत नाहीत. परिणामी नागपुरात मृत्यूसंख्या सुद्धा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे रूग्णालय व्यवस्थापनावर येणार्‍या काळात कटाक्ष असला पाहिजे. रूग्णालयांमध्ये रूग्णांची लूट होणार नाही, यासाठी पुन्हा पूर्वीची ऑडिट यंत्रणा उभारावी लागेल. मेडिकल आणि मेयोत काही असुविधा आहेत

. उच्च न्यायालयाने त्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. तेथे गरिब रूग्ण मोठ्या संख्येने जात असल्याने त्याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. नागपूर शहरात गेल्या काळात स्मार्ट सिटीची कामे करताना आपण सीसीटीव्ही यंत्रणा जागोजागी उभी केली आहे. त्यामुळे त्याची मदत घेऊन विलगीकरणाचा नियम मोडणार्‍यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. या काळात अनेकांनी मंगल कार्यालये किंवा हॉल्स बुक केले होते. आता ते पैसे परत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी काहीतरी एसओपी तयार केले पाहिजेत, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Team Global News Marathi: