प्रसारमाध्यमांसमोरील वक्तव्य भोवणार; नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार? न्यायालयाच्या अटी-शर्तींचा भंग

प्रसारमाध्यमांसमोरील वक्तव्य भोवणार; नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार? न्यायालयाच्या अटी-शर्तींचा भंग

 

प्रसारमाध्यमांशी चकार शब्दही बोलायचा नाही या अटीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. मात्र नवनीत यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर बकबक करताना राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळे ही बकबक राणा यांना आता चांगलीच भोवणार असून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली नवनीत राणा यांचा भायखळा महिला कारागृहात तर रवी राणा यांचा तळोजा जेलमध्ये 14 दिवस मुक्काम होता. सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केल्यावर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेताच त्यांनी प्रसारमाध्यमांना ‘मुलाखत’च दिली आणि न्यायालयाच्या अटी-शर्तीचा भंग केला.

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ‘पुन्हा असा गुन्हा करू नका’ अशी तंबी देत राणा दांपत्याला जामीन मंजूर केला होता. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलू नका, पोलिसांच्या तपासात कोणतेही अडथळे आणू नका, साक्षीदारावर दबाव आणू नये, साक्षीदारांना प्रलोभने दाखवू नयेत अशा अटी-शर्तीही न्यायालयाने घातल्या होत्या.

पोलीस व्हिडीओ क्लिप ताब्यात घेणार

पोलिसांनीही आता कार्यवाही सुरू केली असून राणा यांच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडीओ क्लिप्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर कायदा विभागाच्या अधिकाऱयांशी चर्चा करून तयार झालेला अहवाल पोलीस आयुक्तांना दिला जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आज न्यायालयात तक्रार अर्ज करणार

आम्ही राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी उद्या सोमवारी न्यायालयात अर्ज करू. राणा यांच्या विरोधात तत्काळ अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करावे, अशीही मागणी करू, असे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. नवनीत आणि रवी राणा यांनी आज मीडियाशी साधलेल्या संवादाची माहिती आम्ही घेणार आहोत. राणा दांपत्याला सत्र न्यायालयाने घातलेल्या अटी-शर्तींचे जर उल्लंघन होत असेल तर आम्ही योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेणार आहोत, असे अॅड. घरत यांनी सांगितले.

काय म्हणाल्या राणा?

जर हनुमान चालिसाचे पठण करणे आणि भगवान श्रीराम यांचे नाव घेणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस नाही तर 14 वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे, असे नवनीत राणा यांनी आज पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवरही टीका केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: