एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक; घरातून घेतलं ताब्यात!

“माझ्या जीवाला धोका आहे, माझी हत्या होऊ शकते.” असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर दुपारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली, शिवाय राजकीय वर्तुळात देखील तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत, दोषींवर कठोर कारवाईचे गृहमंत्र्यांना व पोलिसांना निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या असून, आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आलं आहे.

पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेऊन गावदेवी पोलीस ठाण्यात आणलं होतं. तेव्हाच सदावर्ते यांना अटक केली जाण्याची देखील दाट शक्यता होती. अखेर जवळपास दीड तासाच्या चौकशीनंतर सदावर्ते यांना सरकारी कामात अडथळा आणल्याचा व कटात सामील असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अटक केली.

तर, वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस त्यांच्या घरून पोलीस स्टेशनला नेत असताना, सदावर्ते यांनी माध्यमांसमोर काही गंभीर विधानं केली. ”मला कोणतीही नोटीस दिलेली नाही, मला थेट ताब्यात घेण्यात आलं आहे. माझ्या जीवाला धोका आहे, माझी हत्या होऊ शकते.” असं ते म्हणाले आहेत.

याशिवाय गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी देखील आरोप केले आहेत. ”आमच्या कुटुंबाला धोका आहे. गुणरत्न सदावर्ते यांना जर काही झालं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील. गुणरत्न सदावर्तेना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांचं वर्तन योग्य नव्हतं.” असं त्यांनी सांगितलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: