एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ 1 जूनपासून धावणार

 

राज्यात लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ही आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी ‘लालपरी’ अर्थात एसटी 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे.

या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे येथे बुधवारी (1 जून रोजी) होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही परब यांनी केले आहे.

1 जून, 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी 1 जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. हा एक दुग्धशर्करेचा योग आहे, अशा शब्दात ॲड. परब यांनी आनंद व्यक्त केला.

1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्यापार्श्वभूमिवर बुधवारी, पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावेल. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचेही उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

Team Global News Marathi: