एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात…; फडणवीसांची टोलेबाजी –

एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात…; फडणवीसांची  टोलेबाजी –

ठाणे : ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. दरम्यान, एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी लगावला.

भाजपचे खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निधीतून ठाण्यात दिव्यांग स्नेही उद्यान व आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून उभारलेल्या कै. वसंतराव डावखरे प्रेक्षा गॅलरीसह विविध विकास कामे आणि ठाण्यातील भाजप नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, प्रदेश सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, कविता पाटील, नम्रता कोळी, नंदा पाटील आदींची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीची संख्या न पाहता वंचितांचे राज्य उभारले. राम राज्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले, तेच सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणकारी सरकार चालविले जात आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

ठाणे शहरातील मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींविषयी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी सातत्याने संघर्ष केला. त्या रहिवाशांना न्याय देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात नियमांना मंजुरी देण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी व घोषणा होण्यास वर्षभराचा कालावधी लागला. या कामाचे श्रेय घेण्यासाठीच अंमलबजावणी रखडवली होती का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. सध्याच्या काळात न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांचा तोच विषय आहे. मात्र, सामान्यांना कोण काम करीत आहे, ते माहिती आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम करीत राहावे. छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन शेवटच्या माणसांपर्यंत न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करू या, असे आवाहन फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणच्या दुर्गाडी पुलासह विविध कामांबाबतचे भाजपाचे श्रेय खेचून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता ठाणे व कल्याण शहरात आपण केलेल्या कामाचे श्रेय ओरडून सांगण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. या वेळी विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर, निरंजन डावखरे यांचीही भाषणे झाली

मुघलांची मनसबदारी व चाकरी करीत असलेल्या समाजात छत्रपती शिवाजी महाराजांनी पौरुष निर्माण केले होते. आताच्या समाजात ते पौरुष पुन्हा निर्माण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांच्या रक्तातील अंश प्रत्येक व्यक्तीत असून, प्रत्येकाने अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी शिवज्योतीचे पूजन करून शिव सन्मान ज्योत यात्रा काढण्यात आली.

भाजपकडून कोट्यवधींच्या कामांचे लोकार्पण

शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाकडून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे आज लोकार्पण करण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुल्या झालेल्या या कामांमुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांना सुविधा मिळणार आहेत, असा विश्वास भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या पुढील काळातही ठाणे शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा खासदार निधी व महापालिकेच्या सहकार्याने गावदेवी मैदानाजवळ दिव्यांग स्नेह गार्डन, आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून उभारलेल्या मारोतराव शिंदे तरण तलावालगत कै. वसंतराव डावखरे प्रेक्षागृह, वागळे इस्टेट येथील रत्ना ज्योती इमारतीजवळ निवारा शेड, कासारवडवली येथील विजय पार्कजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड व कट्टा, कोपरीतील आनंद कोळीवाडा परिसरात निवारा शेड, वसंत विहार चौकात निवारा शेड, दिवा जंक्शन येथे चंद्रभान इमारतीलगत उभारलेल्या इ- टॉयलेटचे लोकार्पण करण्यात आले. तर भाजपच्या नगरसेविका दीपा गावंड यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात उभारलेली ओपन जिम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचा जॉगिंग ट्रॅक, नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी हरीनिवास येथे उभारलेला क्लॉक टॉवर, नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या प्रभागातील सुशोभित केलेल्या कै. वसंतराव डावखरे उद्यानाचेही लोकार्पण करण्यात आले. भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी व नगरसेवक सुनेश जोशी यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून मासुंदा तलावासमोरील जैन स्थानक-दीपक सोसायटी-मारोतराव भवन रस्त्याचे भूमिपूजन पार पडले. तर नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या प्रभागातील गोकुळदासवाडी ते राधाकृष्ण मंदिर आरसीसी रस्ता, गोकूळनगर मुख्य रस्ता ते वीर बजरंग व्यायामशाळेपर्यंत आरसीसी रस्ता, आझादनगरमधील हनुमान मंदिर ते एकता चौकपर्यंत आरसीसी रस्ता आणि भवानीनगर येथे स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: