…म्हणून नाथाभाऊंचं मुख्यमंत्रिपद हुकलं; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

…म्हणून नाथाभाऊंचं मुख्यमंत्रिपद हुकलं; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

ग्लोबल न्यूज: भाजपच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून अखेर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. खडसे शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या त्रासामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे खडसेंनी सांगितले. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसेंबाबत गौप्यस्फोट केला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचे कारण सांगून त्यांनी ते नाकारले. भविष्यात सत्ता येईल की नाही, असे नाथाभाऊंना वाटले. त्यामुळेच त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले असावे, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.

दरम्यान, एकनाथ खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या सुपुत्री रोहिणी खडसेही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: