….तर मी राजीनामा द्यायला तयार : मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने कालच धुळे, नंदुरबार, अकोला,वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार या निवडणूकांसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे;तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल,मात्र या निवडणूकीची घोषणा होताच ओबीसी आरक्षणाचा प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.यातच यावरून आक्रमक होत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

५ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता ओबीसी आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत.यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे.आज पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले,सध्या संपूर्ण देशातले ओबीसी आरक्षण धोक्यात आलेले असून,या परिस्थिती डेटा एकत्र करण्याचे काम आम्ही करणारच आहेत. तसेच अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याचा विचार आमचा सुरू आहे.यामधून काही मार्ग निघालाच नाही तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत असेही आवाहन वटेट्टीवार यांनी यावेळी केले.

 

सर्व पक्षांचे मत विचारात घेवून त्यांच्या संमतीने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाईल,असे स्पष्ट करतानाच सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही तर भाजपा जबाबदार असल्याचा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी वडेट्टीवार यांच्या केलेल्या मागणीवर ते म्हणाले की,माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार असून, हा मुद्दा केवळ राजकीय हेतूने वाढविण्याचे काम चालले आहे आणि राज्यातील जनतेला हे सगळं कळत आहे अशा शब्दात वडेट्टीवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: