सिसोदियांना अटक करण्याचा केंद्राचा डाव, पंतप्रधानांनी आम्हाला एकत्र तुरूंगात टाकावं

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की, एकामागून एक अटक करू नका. याचा परिणाम दिल्लीच्या विकास कामावर होतो. यापेक्षा दिल्लीतील सर्व मंत्री-आमदारांना अटक करून चौकशी केली पाहिजे,” असं केजरीवाल म्हणाले.

सत्येंद्र जैन यांना ईडीनं कथितरित्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. याबाबातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. “मला वाटतं सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणांमध्ये तुरुंगात टाकून या लोकांना दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेले चांगले काम थांबवायचे आहे. पण काळजी करू नका, मी तसे होऊ देणार नाही. सर्व चांगली कामं सुरूच राहील,” असं केजरीवाल म्हणाले.

“मी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं केंद्र सरकार बनावट प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक करणार आहे. माझ्या विश्वसनीय सूत्रांनी मला लवकरच सिसोदिया यांना अटक केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रानं त्यांच्याविरोधात बनावट प्रकरणं तयार करण्याचे आदेश दिले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

Team Global News Marathi: