सिंधुदुर्गात महाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्चर, आता ती सगळीकडेच पंक्चर होईल’

 

पुणे | सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला आहे. या निकालांमध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनेलने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलचा पराभव केला. भाजपा पुरस्कृत पॅनेलला ११ तर मविआ समर्थित पॅनेलला ८ जागा मिळाल्या दरम्यान, विजयानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंचं अभिनंदन केलं आहे. तसेच महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयासाठी मी नारायण राणे, राजन तेली, नितेश राणे या सर्वांचं अभिनंदन करतो. सहकारामध्ये भाजपा काहीसा मागे होता. मात्र गेल्या काही काळात ही कसर भरून निघत आहे. सिंधुदुर्गात मिळालेलं यश हे फार मोठं यश आहे. शिवसेनेला कोकणाच्या जोरावर महाराष्ट्रात राजकारण करण्याची सवय आहे.

मात्र कोकणातला बेस आता सुटू लागल्याने ते हमरीतुमरीवर आले आहेत. तीन चाकी रिक्षा ही महाविकास आघाडीच्या पॅनेलची या निवडणुकीतील निशाणी होती. मात्र ही तीन चाकी रिक्षा या निवडणुकीत पंक्चर झाली, हे या निवडणुकीत दिसून आलं. आता सगळीकडेच ही तीन चाकी रिक्षा पंक्चर होणार आहे, असे भाकितही चंद्रकांत पाटील यांनी केलं.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलचे ११ आणि शिवसेना, मविआ पुरस्कृत पॅनेलचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर भाजपाचेही दिग्गज नेते राजन तेली हे पराभूत झाले आहेत.

Team Global News Marathi: