बार्शीसह ग्रामीण जिल्ह्यात शनिवारी अन् रविवारी दुकाने बंदच राहणार, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

बार्शीत शनिवारी अन् रविवारी दुकाने बंद, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

बार्शी – कोरोना रुग्णांची दररोजची वाढती संख्या लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध येत्या १५ एप्रिलपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेतच सुरू राहतील. दरम्यान, येत्या शनिवार व रविवारीही दिवसभर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बार्शी शहरातही शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहतील, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी दिली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य आहे. तसेच, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आणि मास्कचाही वापर बंधनकारक असल्याचेही दगडे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे, शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे 3 व 4 एप्रिल रोजी बार्शीतील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये, केवळ किराणा व अत्यावश्यक ( यापूर्वीच्या आदेशात मुभा दिलेले) दुकानांना मुभा देण्यात आली आहे.

औषधे, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्र या जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच वगळले असून या सेवा नियमित सुरू ठेवता येणार आहेत. नव्या आदेशानुसार येत्या १५ एप्रिलपर्यंत दहावी व बारावी वगळता सर्व शाळा, खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील, तर खेळ, सामने यात्रा, उत्सव, वारी यावरीलही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. होमडिलिव्हरी व वितरणासाठी मात्र रात्री दहापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी न करता कोरोनापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: