धक्कदायक | गुटखा खाल्ला, ठसका लागला आणि क्षणार्धात गमावला जीव

 

औरंगाबाद | आजवर गुटख्याच्या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊन अनेकांना आपलं आयुष्य गमवावं लागलं आहे. कॅन्सरसारखे अनेक गंभीर आजार गुटख्यामुळे होताता. औरंगाबाद शहरात गुटखा खाण्याचं व्यसन असलेल्या सर्वांचे धाबे दणाणून सोडेल अशी एक बातमी समोर आली आहे. गुटखा खाताना अचानक एका व्यक्तीला श्वासाचा त्रास व्हायला सुरु झाला. खोकला यायला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही क्षणात या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी करुन त्याला मृत घोषित केलं.

गणेश जगन्नाथ वाघ असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. गणेश हा गेल्या २० वर्षांपासून राहुल साहुजी या व्यक्तीकडे कामाला होता. गुरुवारी संध्याकाळी साहुजी यांच्या घरात डिश टीव्ही बसवण्याचे काम सुरु असताना गणेश गुटखा खाऊन काम करत होता. यावेळी त्याला अचानक ठसका लागला आणि खोकल्याची उबळ आली. यानंतर गणेश बेशुद्ध पडला.

त्याच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी गणेशला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत गणेशचे प्राण गेले होते. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी ही घटना घडल्यानंतर गणेशच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी गणेशच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर ठसका लागल्यामुळे सुपारीचा तुकडा घशात अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

Team Global News Marathi: