शिवसेनेला आणखी एक धक्का ! दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना?

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील कोणीही आमदार नाही असे सांगितले जात असतानाच दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला पोहोचत असल्याचे वृत्त वाहिनीवर झळकत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात एका कार्यक्रमानिमित्त दापोलीत आलेल्या नेते एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या भेटीचे रहस्य आता उलगडले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत कोकणातील एकही शिवसेना आमदार नाही असे काल मंगळवारपर्यंत सांगितले जातं होते. मात्र, त्याला धक्का बसला असून दापोलीचे आमदार योगेश रामदास कदम हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीकडे रवाना झाल्याचे माध्यमामध्ये झळकू लागले आहे. अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून आमदार योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम यांना शिवसेनेपासून, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून सोईस्कररित्या बाजूला ठेवण्यात येतं होते. रिसॉर्ट प्रकरणी एका ऑडिओ क्लिपचे कारण देत मंत्री अनिल परब यांनी कदम पिता पुत्रांना पक्षात कॉर्नर केले होते. जानेवारीमध्ये झालेल्या मंडणगड, दापोली नगर पंचायतीच्या निवडणुकीपासून स्थानिक आमदार असूनही योगेश कदम यांना बाजूला ठेवण्यात आले. यासाठी राष्ट्रवादीशी अनिल परब यांनी जवळीक करून निष्ठावंताना बाजूला ठेवले होते. योगेश कदम यांनीही अपक्ष उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून दिली होती. तर याचं दरम्यान रामदास कदम यांनीही मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती.

Team Global News Marathi: