शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समर्थनार्थ पोलीस अधिकाऱ्याची पोस्ट

 

काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल आणि संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांच्या विरोधात वारकऱ्यांनी आंदोलनही केले. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिगीरीही व्यक्त केली होती; परंतु तरीही त्यांच्यावर टीका करणे हे सुरूच आहे.

या सर्व प्रकरणावरून आता सुषमा अंधारे यांच्या समर्थनार्थ थेट माजी पोलीस अधिकारीच आला आहे. सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालली आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुम्ही तुमचे काम असेच चालू ठेवा, असा सल्ला या पोलीस अधिकाऱ्याने दिला असून सुषमा अंधारे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी सुषमा अंधारे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर अंधारे यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली असून सुरेश खोपडे यांची ही पोस्ट अत्यंत ऊर्जादायी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, खोपडे यांनी पोस्टमधून भाजपवर जोरदार निशाणा साधला.

सुरेश खोपडे यांची पोस्ट : –

सुषमा अंधारे म्हणाल्या, सकाळी सकाळी अंकूश काकडे काका यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर यांची ही अत्यंत ऊर्जादायी अशी ही पोस्ट पाठवली ….

सुषमा अंधारे यांच्या जाळ्यात कोण कोण अडकले? आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही असे जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मंडळींचे हिंदुत्व उघडेनागडे करून दाखविले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले गेले. सुषमाताईंनी संयतपणे विरोधकांना प्रश्न विचारून राजकीय दृष्ट्या नामोहरण केले. त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. बचाव करता येत नाही म्हणून त्यांनी ज्यांना जाणवे व शेंडीच्या पलिकडचा हिंदू धर्म माहीत नाही त्या तथाकथित वारकऱ्यांना पुढे केले. त्यात नकली वारकऱ्यांचा दर्जा दिसून आला. तात्पर्य एका महिलेने तीन-चार महिन्यात फेकलेल्या जाळ्यात एवढे मासे अडकले. ती क्लिप दहा-बारा वर्षांपूर्वीची असताना ती पुन्हा दाखवली गेली आणि त्यावर तथाकथित वारकरी महिला व पुरुषांनी सुषमा अंधारे यांना वारकऱ्यांना न शोभणारी भाषा वापरली. एवढेच नव्हे तर हल्ला करण्याची फाडून टाकण्याची भाषा केली. हे सगळे देवेंद्र फडणवीस यांचे भाडोत्री सैनिक दिसतात. राजकारण्यावर शाई फेकली तर खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे देवेंद्र फडणवीस दाखल करतात. मग सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्रीही उघडे पडले. देवेंद्रजी कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत. सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. पक्ष असो किंवा नसो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत! अशा मांडणीतूनच समाज व्यवस्थेची रचना आधुनिकतेकडे आणि घटनेवरील आधारित मूल्यावर पुढे नेता येईल. सिव्हिल सोसायटी म्हणून ते आपल्या सर्वांचे एक कर्तव्यच आहे.

– सुरेश खोपडे

Team Global News Marathi: