शिवसेना प्रमुख बाळासाहेब असते तर…; खासदार नवनीत राणा संतापल्या

 

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मालमत्तेवरही ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबाग येथील काही जमिनींचा समावेश आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचं शरद पवारांनी सांगितले. त्यात आज संजय राऊत दिल्लीतून मुंबईत येत आहेत. त्यामुळे विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.

राऊतांच्या स्वागतासाठी केलेल्या गर्दीवरून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर नाही. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला. महाराष्ट्रातील लोकांच्या पैशाचा गैरवापर केला. ते तपासात अडकले आहेत. त्यांचे स्वागत शिवसैनिक करत आहेत.

त्या म्हणाल्या की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर महाराष्ट्रात असे घडले नसते. बाळासाहेबांनी भ्रष्टाचारी लोकांना उभं पण केले नसते. राऊतांवरील आरोप सिद्ध होत असल्याने संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी विचार करून या गोष्टी केल्या पाहिजेत अशा शब्दात नवनीत राणांनी भाष्य केले आहे.

मुंबई विमानतळाबाहेर संजय राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. त्यामध्ये शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येतोय. गेली २ वर्ष हा योद्धा पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठी भाजपाशी लढत आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजकीय सूडापोटी संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आम्ही सगळे शिवसैनिक योद्धाला सलाम करण्यासाठी आलो आहोत. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: