शिवसेनेचे खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत; उद्धव ठाकरेंसमोर आपली इच्छा स्पष्टच सांगितली

शिवसेनेचे खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत; उद्धव ठाकरेंसमोर आपली इच्छा स्पष्टच सांगितली

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत शिवसेना खासदारांनी आपली ‘इच्छा’ स्पष्टच सांगितली…

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत काही खासदारांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पॅच-अप करण्याची विनंती ठाकरे यांना केल्याचे समजते.

शिवसेनेचे दीर्घकालीन हित विचारात घेऊन शिंदे गटाशी जुळवून घेतले जावे, अशी भूमिका काही खासदारांनी मांडल्याची माहिती त्या पक्षातील सुत्रांनी दिली. त्या भूमिकेला ठाकरे यांनी काय प्रतिसाद दिला ते तातडीने समजू शकले नाही. शिवसेनेचे लोकसभेत 19 खासदार आहेत.

त्यापैकी श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि राजन विचारे हे 3 खासदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. श्रीकांत हे मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आहेत. विचारे हे शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात. तर, गवळी यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे यांना पत्र पाठवून बंडखोर गटाची गाऱ्हाणी ऐकून घेण्याची मागणी केली होती.

खासदारांना नेमकी कोणती भीती?

भावना गवळी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. त्याही ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या एका सहकाऱ्याला ईडीने अटकही केलेली आहे. तर, शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत गोव्यात आहेत. आपल्या मतदारसंघातील आमदार शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे खासदारांची कोंडी झाली आहे. हे बंडखोर आमदार शिवसेनेत आले नाही तर निवडणुकीत मोठा फटका बसण्याची भीती या खासदारांना वाटत आहे. त्यामुळे शिंदे गटाशी जुळवून घेण्याचं हे खासदार सांगत आहेत. यातील 14 खासदार वेगळा निर्णय घेण्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केल्याचा वृत्त आहे.

शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटाचा भाग बनू शकतात अशी चर्चा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, ठाकरे यांनी खासदारांशी संवाद साधण्याला महत्व आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: