फडणवीसांसह त्यांच्या टोळीकडून रोज वैफल्यग्रस्ततेचे दर्शन, शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची जळजळीत टीका  

 

मुंबई | विरोधी बाकावरचे सदस्य ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक नव्हते, तर महाविकास आघाडीच्या ऐक्याने हतबल आणि सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडवीत आहे, त्याचाच हा एक पुरावा आहे, असे ट्विट करून शविसेना आमदार यामिनी जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होत. यावरूनच आमदार जाधव यांनी टीका केली होती.

‘जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात. कधी कधी भावना अनावर होतात आणि सदस्यांकडून अनुचित प्रकार देखील घडतात. ते स्वाभाविकही आहे. मात्र आपल्या मर्यादांचे भान ठेवणे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतःच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. त्यापेक्षा अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची ठेवली पाहिजे.

मात्र भाजपच्या सदस्यांनी लोकशाहीच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासातील आजचा दिवस काळाकुट्ट आहे. भाजपचे आमदार वेलपर्यंत गेले. राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला, कामकाज तहकूब झाले, इथपर्यंत ठीक होते. असे प्रसंग सभागृहात वारंवार घडतात. यापूर्वीही घडले आहेत. असे प्रसंग उद्भवले की पीठासीन अधिकारी आपल्या दालनात दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ सदस्यांना घेऊन वातावरण पूर्ववत करतात. चिडलेल्या सदस्यांची समजूत काढतात. हा प्रघात आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

‘मात्र भाजपचे आमदार एका टोळीच्या मानसिकतेत होते. त्यांनी झुंडीने पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दिशेने कूच केली. गोंधळ घातला. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी सभागृहात केलेले निवेदन भाजप आमदारांच्या हीन मनोवृत्तीवर झगझगीत प्रकाश टाकते. धक्काबुक्की, आई बहिणीच्या शिव्या, झोंबाझोंबी हे नाक्यावर सुद्धा न घडणारे प्रकार प्रत्यक्ष पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आले, संकेत, प्रथा परंपरा यांना अक्षरशः हरताळ फासण्यात आला,’ असेही यामिनी जाधव यांनी सांगितले.

 

Team Global News Marathi: