शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

 

मुंबई |  शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

संजय राऊत हे काही वेळापूर्वीच वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी राऊत चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. या भेटीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच या भेटीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची या बाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्या संदर्भातही पवार राऊतांकडून माहिती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही बैठक किती वेळ चालेल याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सोमवारी एसटी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी वाढल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात या संदर्भात बैठक झाली. यावेळी विलीनीकरणापासून ते सरकारवर येणाऱ्या आर्थिक बोझापर्यंतच्या बाबींवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता या भेटीनंतर संजय राऊत माध्यमांवर काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: