आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मुंबई : सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली.
अडसूळ हे सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना खातेधारकांचे पैसे बेकायदा पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध करुन देण्यात आले. त्यात सुमारे ९०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, अशी तक्रार आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाचा ससेमिरा अडसूळ यांच्या मागे लागला आहे. ईडीने त्यांना चौकशीला बोलावले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे सांगत अडसूळ यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता.
अडसूळ यांनी सुरूवातीला जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. पण ही याचिका फेटाळत न्यायालयाने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले होते. पण इथे जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर अडसूळांनी हाय कोर्टात पुन्हा धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. हाय कोर्टानेही अडसूळांना दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळून लावला.