“शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचने देणे म्हणजे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षण

 

राज्यात शिवसेना पक्षाने विभिन्न विचारसरणीअसलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती, याच मुद्द्यावरून विरोधकांनी हिंदुत्वादाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला टारगेड केले होते. आता शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

 

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱ्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? महाराष्ट्रात शिवसेनेने काय केले व करायला हवे त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरील हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही. एका राज्यात गोमांसावरून लोकांना ठार करायचे व दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची हे तुमचे बेगडी हिंदुत्व. हे तुमचे नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावरील ही फुकाची प्रवचने आता बंद करा! कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.

तसेच महाराष्ट्रातील बेगडी हिंदुत्ववादी जे ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले होss’ म्हणून कंठशोष करीत आहेत त्यांना बांगलादेशातील हिंदूंची होत असलेली राखरांगोळी चिंतामग्न करीत नाही. कश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे. हिंदू हा असा खतरे में आला असताना फुकाची प्रवचने झोडण्यात काय हशील? मोदी सरकारने दोन मंत्र्यांना अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर येथे ठाण मांडूनच बसवायला हवे व जी काही प्रेरणादायी पोपटपंची करायची आहे ती तिकडे करा, असे सांगायला हवे असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

भारतीय जनता पक्षात सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा(Hindutva) पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. खरे तर हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही. देशातील एकंदरीत स्थिती अशी आहे की, आज हिंदू खतऱ्यात आला आहे. हा मजकूर लिहीत असताना कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने आमचे काळीज अस्वस्थ झाले आहे. कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत व त्यांनी मोठय़ा प्रमाणावर पलायन सुरू केले आहे.

नव्वदच्या दशकात कश्मीर खोऱ्यात अगदी अशीच तणावाची स्थिती होती. गेल्या पंधरा दिवसांत कश्मीर खोऱ्यातील 220 हिंदू-शीख कुटुंबांनी जम्मूतील निर्वासितांच्या छावण्यांत आश्रय घेतला आहे. हे काही (नव) हिंदुत्ववाद्यांसाठी चांगले लक्षण नाही. शिवसेनेस सध्या हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांना कश्मीरातील हिंदूंचे पलायन आणि हत्या दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते.

कश्मीरात हे असे, तर तिकडे बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. हिंदूंच्या वस्त्या जाळल्या जात आहेत. हिंदू मुलींच्या इज्जतीवर हल्ले सुरू आहेत. संपूर्ण बांगलादेशात हिंदू समाज भीतीच्या सावटाखाली कसाबसा जगतो आहे. बांगलादेशातही असेच एक पथक पाठवून तेथील हिंदूंना दिलासा द्यायला हवा असे अग्रलेखात म्हंटले आहे.

Team Global News Marathi: