शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही मराठी भाषेसाठी काहीच तरतुदी नाही – दिवाकर रावते

शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला चांगलेच फटकारले आहे. मराठी भाषा मुद्दयावर आक्रमक होत त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असतानाही मराठी भाषेसंदर्भात असे होत आहे, असे सांगत रावते यांनी सभागृहात आघाडी सरकार विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांचा वापर करणे चुकीचे असल्याचे रावते यांनी म्हटले आहे. मराठीमध्ये शब्द संग्रह असताना देखील इंग्रजीचा वापर करणे हास्यास्पद प्रकार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक शब्द देखील व्यक्त करण्यात आलेला नाही, असे सांगत रावते यांनी जाहीरपणे आघाडी सरकार विरोधात खंत व्यक्त केली.

रावते पुढे म्हणाले की, आमच्या कॉमन मिनिमम प्रॉग्रॅममध्ये नाही म्हणून औरंगाबादला संभाजी नगर बोलायचे नाही असे बोलल्यावर शांत बसायचे. या अर्थसंकल्पात मराठी विद्यापीठाबाबत तरतूद करण्यात आलेली नाही. आणि मला याबाबत बोलावे लागत आहे हे वाईट आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि अर्थसंकल्पात मात्र मराठीसाठी काहीच नाही, असे नमूद करताना मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर मला त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं, तर मग मी त्यांना काय उत्तर देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: