नारायण राणे बंगल्याबाहेर शिवसैनिक-राणे समर्थक भिडले

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. नाशिकमध्ये राणेंच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी नाशिकचे एक पोलीस पथक चिपळूणला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे नारायण राणेंविरुद्ध मुंबईत देखील शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राणेंच्या विरुद्ध मुंबईत पोस्टरबाजी सुरु झाली असल्याचे दिसून आले होते .

मुंबईतील दादर टीटी भागात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला आहे. त्यावर ‘कोंबडी चोर !!!’ असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले होते. आता त्या पाठोपाठ शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

मुंबईतील नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तर भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थकही जुहू बंगल्यावर जमा झाले आहेत. नारायण राणे यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून येत आहेत. पोलिसांनी जुहू येथे मोठा बंदोबस्त लावला असून राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

युवा सेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याला राणे समर्थकांनी विरोध केला. दोन्ही कार्यकर्ते आक्रमक असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. दोन्ही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर केला. आक्रमक शिवसैनिक नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. तर भाजपा कार्यकर्तेही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे.

Team Global News Marathi: