शिंदे गटाला राष्ट्रपती निवडणुकीच्या बैठकीला एनडीए’चे निमंत्रण; संजय राऊत म्हणाले,

 

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राजकारण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवारांच्या नावाचे प्रस्ताव दिल्यानंतर अखेरिस विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. तर भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेकडूनही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा मिळावा, यासाठी खासदारांनी उद्धव ठाकरेंना आग्रह केला आहे. खासदारांच्या झालेल्या बैठकीनंतर आता शिवसेना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते, हे जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी द्रौपदी मुर्मू यांना देण्यात येणाऱ्या पाठिंब्याविषयी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या गटाला एनडीएने राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीसाठी निमंत्रण मिळाले आहे. दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आम्ही या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे पाहतो, असे संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना बंधनकारक आहे, असे संजय राऊत म्हणाले. खासदारांच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि भावना गवळी उपस्थित नव्हते. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Team Global News Marathi: