शिंदे गटातील आमदारावर भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप,

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकत्र अनेक दौऱ्यांमध्ये दिसले आहेत. शिंदे गट आणि भाजपचं सरकार कसं भक्कम आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला आहे. मात्र नागपुरात शिंदे गट आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. मूळचे शिवसैनिक असलेले रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात भाजपमधूनच बंडाचा झेंडा उभारण्यात आला आहे.

भाजपच्या नागपूर जिल्हा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आशिष जयस्वाल यांच्या भ्रष्टाचाराची, तसेच त्यांच्यासह नातेवाईक व निकटवर्तीयांच्या संपत्तीची ईडी-सीबीआयमार्फत चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी केली. आशिष जयस्वाल हे खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी रॉयल्टीच्या नावावर खनिज संपदेची लूट केली. रेती, मुरमाची विक्री केली. शेतातून मातीमिश्रित रेती काढण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी सूर नदीलगतच्या जमिनी नातेवाईक व निकटवर्तीयांच्या नावावर खरेदी केल्या.

तेथील रेती काढून सरकारचा 150 कोटींचा महसूल बुडवला, असाही आरोप राजेश ठाकरे यांनी केला.आशिष जयस्वाल यांनी मॅक्सवर्थ या कंपनीशी हातमिळवणी करून रामटेक-पारशिवनी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. पुढे यातील काही जमिनी त्यांचे बंधू अनिल जयस्वाल यांनी संबंधित कंपनीकडून खरेदी केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. या सर्व प्रकरणाची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी आणि तोपर्यंत आशिष जयस्वाल यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये मागणी भाजपच्या शेतकरी आघाडीने केली आहे.

Team Global News Marathi: