शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल

 

शिवसेनेच्या शिंदे गटानं आता खासदार संजय राऊत यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून गुलाबराव पाटलांपर्यंत आणि दीपक केसरकरांपासून आमदार संजय गायकवाडांविरुद्ध सगळ्यांनीच राऊतांवर टीकेचा निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड पुकारणाऱ्या ४० आमदारांवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीकेची तोफ डागली होती. अगदी आमदारांना डुक्कर आणि रेडा म्हणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. बंडखोर आमदारांचा बाप काढण्यापर्यंत त्यांची जीभ घसरली.

राऊतांच्या या टीकेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील व्यथित झाले. विधानसभेतल्या पहिल्याच भाषणात त्यांनी राऊतांचं नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली. राऊतांनी मात्र बंडखोरांवर टीकेचा भडिमार सुरूच ठेवलाय. रूकने वाला वजह धुंडता है और जाने वाले बहाने हा राहत इंदौरींचा शेर त्यांनी ट्विट केलाय.

मात्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव प्रचंड बहुमतानं जिंकल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटालाही आता अधिक जोर चढला आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय. ज्या शिवराळ भाषेत राऊतांनी टीका केली, अगदी त्याच भाषेत गायकवाडांनी पातळी सोडून परतफेड केलीय.

संजय राऊत यांची शरद पवारांशी असलेली सलगी अनेकांच्या डोळ्यात खुपतेय. राष्ट्रवादीची सुपारी घेऊन राऊत शिवसेना संपवत असल्याचं बोललं जातंय. आधी भाजपमधून त्यांच्यावर टीका व्हायची. आता शिंदे गटानं राऊतांवर रोखठोक हल्ला चढवायचं ठरवलं आहे आता या टीकेला संजय राऊत काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: