शिंदे गटाचे भविष्य चांगले नाही, हे शिंदेंनासुद्धा माहितीये – अमोल मिटकरी

 

जळगावमध्ये एका सभेला संबोधित करताना भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील इथे उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले, शिवसेना पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन’ राबवले होते. महाजन यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील त्यांच्या विधानावरून प्रतिक्रिया दिलेली आहे. ते आज राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्यात आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले, गिरीश महाजन काही चुकीचे बोलले नाहीत. त्यांच्या या विधानाबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या मनात जे होते, तेच त्यांनी बाहेर आणले आहे. भाजपनेच सहा महिन्यांपूर्वी फोडाफोडीचे राजकारण केले, हेच महाजन यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे अमोल मिटकरी म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना मिटकरी म्हणाले, शिंदे हे काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. रोज एकजण उठतो आणि त्यांच्या विरोधात बोलायला लागतो. तसेच, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यापैकी शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नसून सर्व जागा भाजपने घेतल्या आहेत. काल नवनीत राणा अमरावतीत बोलताना म्हणाल्या की, आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. चंद्रकांत पाटीलसुद्धा म्हणाले होते, की छातीवर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. त्यामुळे शिंदे गटाचे भविष्य हे काही चांगले नाही, हे एकनाथ शिंदे यांनादेखील माहिती आहे. त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत, असा टोला मिटकरी यांनी लगावला.

Team Global News Marathi: