शरद पवारांनी भाजपचा दावा खोडून काढला म्हणाले की,

 

राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. एकूण ६०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या निकालाची माहिती आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गोळा केली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक १७३ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेस पक्ष ८४, भाजप १६८ आणि शिंदे गटाला ४२ जागांवर विजय मिळाला आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्यात, याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. मात्र, महाविकास आघाडीने एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. ते मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना भाजपदेखील ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा करत असल्याबद्दल विचारण्यात आले. यावर पवार यांनी म्हटले की, आमच्याकडे असलेली अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगितली. आता दुसऱ्यांना ते सर्वाधिक जागा जिंकलेत या आनंदात राहायचे असेल तर राहू द्या, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली.

Team Global News Marathi: