शरद पवारांना अकार्यक्षम, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता, ती गरज सरली…

 

महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये परस्परांना सोडचिठ्ठी देण्याची स्थिती दिसत आहे. २९ जूनपर्यंत हे तीन पक्ष एकत्रितपणे सत्तेत होते, पुढची पंचवीस वर्षे आम्हीच राहू, असं सांगत होते, आणाभाका घेत होते अन् आज सत्तांतरानंतरच्या ३६ दिवसांत त्यांच्यात ३६ चा आकडा तयार झालेला दिसत आहे.इतक्या अल्पावधीत हा बदल होईल, असे वाटले नव्हते. यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे. तसेच शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

“शरद पवारांना अकार्यक्षम, रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता, ती गरज सरली… आता फाटाफूट होणारच” असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “पवारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी हवे होते ते काही प्रेमापोटी नव्हे. त्यांना अननुभवी, अकार्यक्षम आणि रबर स्टॅम्प मुख्यमंत्री हवा होता. ती गरज सरली, त्यामुळे आता फाटाफूट होणारच” असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी असो की ओबीसी आरक्षणाची; राष्ट्रवादीचे नेते हे शिवसेना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना सोबत न घेता एकटेच राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत. तीन पक्षांची एकही संयुक्त पत्रपरिषद होताना दिसत नाही. अतिवृष्टीग्रस्त भागाचे दौरे राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नेते वेगवेगळे करीत आहेत. ठाकरेंची शिवसेना स्वत:लाच सावरण्यात गुंतली आहे. शत्रूंना निपटवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे कुठे? सध्या त्यांचा आपल्यांशीच झगडा सुरू आहे. वाघाचीच शिकार चालू आहे. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे हे पितापुत्र पक्ष वाचविण्यासाठी कसरत करत आहेत असा टोला सुद्धा लगावला.

Team Global News Marathi: