शरद पवारांच्या निवृत्तीमुळे महाविकास आघाडीच्या पुढील तिन्ही सभा रद्द

मुंबई | महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा BKC मैदानावर मुंबईत पार पडली. ही महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होती. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन केले जाणार होते.

मात्र, महाविकास आघाडीच्या पुढील तीन वज्रमूठ सभा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या निवृत्तीमुळे वज्रमूठ सैल झाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे येणाऱ्या भविष्यात महाविकास आघाडीच्या युतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना वज्रमूठ सभा रद्द होण्याच्या माहितीबाबत प्रश्न विचारण्यात आले. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उन्हामुळे सभेच्या तारखा बदलण्यात आल्या आहे. सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ही चर्चा १ तारखेलाच अनौपचारिक चर्चा झाली होती, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. मात्र, संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईतील वज्रमूठ सभा सायंकाळी आयोजित करण्यात आल्याने जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Team Global News Marathi: