शरद पवार यांची वक्तव्ये दर आठवड्याला बदलतात, राजू शेट्टी यांनी लगावला टोला

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भविष्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चेचेला उधाण आले होते अशातच आता पवारांच्या या विधानाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी समाचार घेतला आहे. साताऱ्यात पावसात भिजत शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी करावयाची आहे असे ते म्हणाले होते. ज्या पद्धतीने पहिल्या पावसात शेतातील ढेकळे विरघळतात त्या पद्धतीने पवारांच्या भिजलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी विरघळला.

मात्र त्यानंतर पुढे काय घडले हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. दर आठवड्याला शरद पवार यांची वक्तव्य बदलत राहिल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला किती प्रतिसाद द्यायचा ? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेट्टी साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, सध्या राज्यभर महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत. विरोधकांनी आपली बाजू मांडली पाहिजे पण या सभांमधून एकमेकांचे वस्त्रहरण करताना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कळकळीचे मुद्दे मांडले जाताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर भाषणात मते मांडली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली असती. पण बरीचशी राजकीय मंडळी ईडीने भेदरलेली असल्यामुळे एकमेकांचे वस्त्रहरण करण्यापलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडताना दिसत नाहीत.

सध्या दिल्लीतून मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत याविषयी बोलताना श्री. शेट्टी म्हणाले, यावर बोलण्यात मला अजिबात रस नाही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काही होत नाही. सातारा बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकरी हमाल दलाल यांच्यासाठी एक पॅनेल उभे केले आहे. हे पॅनल निवडून आल्यानंतर बाजार समिती सुरू असलेल्या उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढल्या जातील. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे हे पॅनेल उभे केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: