शरद पवार स्वत: पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी

 

शिवसेनेत उभी फूट पडली, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं आणि शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एका क्षणात राज्यातील राजकीय परिस्थिती पलटली. महाविकास आघाडी सरकारला चितपट करत शिंदेंनी फडणवीसांच्या साथीनं करेक्ट कार्यक्रम केला. महाविकास आघाडीला इतका मोठा धक्का बसताना या आघाडीचे शिल्पकार शरद पवार शांत होते. सारं पाहात होते. पण आता त्यांनी शिंदे सरकारला धोपीपछाड देण्यासाठी मास्टर प्लान आखलेला दिसत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी स्वत: चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे याची सुरुवात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरुवात केली आहे.

शरद पवार आज ठाणे दौऱ्यावर आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी शरद पवार पोहोचले आहेत आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्याबाबत ठाण्यात पक्षाला कसं यश मिळवून देता येईल याबाबत शरद पवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.

नुकतंच डावखरे आणि गणेश नाईक यांनीही भाजपाची वाट धरल्यामुळे ठाण्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. डावखरे, नाईकांनी भाजपाची वाट धरल्यानंतर शरद पवारांकडून आता जितेंद्र आव्हाड यांना बळ दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या घरीच पवारांनी पक्षाची बैठक बोलावली आहे.

Team Global News Marathi: