शंभूराज देसाई उद्या बेळगाव सीमेवरील शिनोळी गावात जाणार

 

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. पण त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या शिनोळी गावात जाणार आहेत. मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अर्थात शंभूराज देसाईंच्या या दौऱ्याची कर्नाटकडून देखील प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं आहे. बेळगावपासून अगदी जवळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात ते शुक्रवारी (16 डिसेंबर) जाणार आहेत .

एबीपी माझाने या गावातील लोकांना कोणत्या परिस्थितीत जगावं लागतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्नाटकने इथल्या लोकांवर पिढ्यानपिढ्या कसा अत्याचार केला यांचा पाढा वाचला. शंभूराज देसाई बेळगावमध्ये न जाता बेळगाव सीमेवरच्या शिनोळी गावात जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सीमांचं उल्लंघन करायचं नाही हा अमित शाहांनी घालून दिलेला नियम ते पाळणार आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तापणार आहे.

Team Global News Marathi: