शाहू महाराज सृष्टी भूमिपूजन कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राजकीय श्रेय घेण्यासाठी भाजपने पुन्हा सुरवात केली आहे. त्यातच प्रोटोकॉल प्रमाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निमंत्रण देण्याचे डावलण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहू महाराज सृष्टी साकारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते आज होणार आहे.

मात्र या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रित न करता राजशिष्टाचार धाब्यावर बसवत निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हेली खेळली आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावत राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच श्रेय लाटण्याचा आरोप केला आहे.

शाहू सृष्टीच्या भूमिपूजनाबरोबर महापालिकेच्या पिंपरी चौक येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे आणि फुले सृष्टी साकरण्याच्या कामाचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम उपस्थित होते.

Team Global News Marathi: