स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम, अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड अपेक्षित – नाना पटोले

 

मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देत मित्रपक्षांची झोप उडवली होती. या त्यांच्या निर्याणानंतर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला स्वबळाच्या मुद्द्यावरून टोला लगावला होता. मात्र आता पुन्हा एकदा पटोले आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे विधान केले आहे. ते जळगाव येथे बोलत होते.

आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल, त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा यावर तिन्ही पक्षांमध्ये वाद होताना दिसून येणार आहे.

पटोले म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र ही निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहात असणे अपेक्षित असते. गेल्या अधिवेशनात अनेक आमदार कोविड संसर्गामुळे येऊ शकले नाहीत.

Team Global News Marathi: