स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती सचिन वाझेच्या ताब्यात होती, अनेक गोष्टींचा होत आहे खुलासा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. मात्र आता या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यात आली होती ती गाडी चोरीला गेल्याचा प्रथम बनाव करण्यात आला होता. मात्र ती गाडी चोरीला न गेल्याची माहिती आता पुढे येत आहे. ही गाडी अनेक दिवसांपासून वाझे यांच्या ताब्यात होती. तसेच ती चोरीला गेल्याची खोटी तक्रार करायला सांगितल्याचे NIA च्या तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार कधीच चोरी झाली नव्हती. कुणाच्या तरी दबावाखाली ही कार चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, असा NIA ला संशय आहे. वाझेंनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बेकायदेशीररित्या काढून घेतल्याचंही तपासातून उघड झालं आहे.

पोलिसांच्या ऑफिशियल वापरासाठी हे डीव्हीआर पाहिजेत, असे सांगून वाझेंनी सोसायटीकडून सीसीटीव्ही फुटेज काढून घेतले होते. त्यानंतर हे फुटेज डॅमेज करण्यात आले होते. चौकशीच्यावेळी कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्यांनी हे केले होते.

Team Global News Marathi: