शिवसेना-राष्ट्रवादीत ‘या’ मुद्यावरून मतभेद ! वाचा सविस्तर-

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने थेट लॉकडाऊनला विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद येथे भाजप नेते अमित शाह व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तूळात आहे. त्यानंतर पवारांची प्रकृती बिघडल्याने ते स्वतः ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत लॉकडाऊन नियोजनाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाला तर छोटे किरकोळ व्यापारी, मजूर, रोजंदारी कामगार यांच्यासह सर्वसामान्यांनाही अडचणी येऊ शकतात.

राष्ट्रवादीतील नेत्यांचा गट या लॉकडाऊनला विरोध करत आहे. लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी, आमची भूमिका आहे.राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही, तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. यापूर्वीही पवारांनी लॉकडाऊन विरोधात भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या होत्या.

“अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.”, असे मत माजी खासदार व भाजप प्रदेश सचिन नीलेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: