“सावरकरांनी राजनाथ सिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का?

 

विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटीशांकडे माफीनामा पाठवला हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य धादांत खोटे व दिशाभूल करणारे आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांना इतिहासाची मोडतोड करून जनतेची दिशाभूल करण्याची विकृती असून सावरकरांबाबत केलेले हे विधानही त्याच पद्धतीचे आहे. सावरकर यांनी राजनाथसिंह यांना स्वप्नात येऊन ब्रिटिशांना माफीनामा का दिला हे सांगितले होते का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

राजनाथसिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, सावरकर व महात्मा गांधी यांचे वैचारिक मतभेद होते, दोघांच्या विचारात जमीन अस्मानचे अंतर आहे. सावरकर यांनी जेलमधून सुटका करुन घेण्यासाठी ब्रिटीश सरकारकडे अनेकवेळा माफीनामे सादर केले होते हे सर्वश्रुत आहे. सावरकरांची १९११ साली अंदमानच्या जेलमध्ये रवानगी केली होती, जेलमध्ये गेल्यानंतर सहा महिन्यातच सावरकर यांनी ब्रिटिशांना पहिला माफीनामा पाठवला होता.

पुढे ते म्हणतात की, दुसरा माफिनामा १४ नोव्हेंबर १९१३ साली पाठवला त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून ९ जानेवारी १९१५ रोजी भारतात आले. यावरून महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून माफीनामा सादर केला हे राजनाथसिंह यांचे विधान कपोलकल्पीत व हास्यापद वाटते. महात्मा गांधी यांच्याबद्दल रा. स्व. संघ व भाजपाचे विचार किती विकृत आहेत हे जगाला माहित आहे. राजनाथसिंह यांनीही संघाच्या शिकवणीप्रमाणे असत्य विधान करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

Team Global News Marathi: