‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा थेट अधिकाऱ्यांना दम

 

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना झापले. मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात मुसळधार पावसाने नागरीकांच्या घरात पाणी शिरले, गटारे भरुन रस्त्यांवर पाणी आले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे नगरपरीषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावेळी राणे मालवण नगरपरिषदेवर गेले होते.

राणेंनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? असा सवाल करत करत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी राणेंनी आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे. असा दम देखील अधिकाऱ्याला दिला. सत्ताधाऱ्यांसोबत मिळून तुम्ही मालवण शहराची वाट लावली असे देखील राणे म्हणाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, मी यापूर्वी देखील तुम्हाला वाईन शॉपची तक्रार दिली होती. पण तुम्ही कोणतीही कारवाई केली नाही. अशी आठवण करुन देत राणे म्हणाले, आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा गप्प बसलो होतो. पण आता गप्प बसणार नाही. आता टेबल फिरले आहे.आमच्या वाकड्यात जाऊ नका असे तुम्हाला मागे सांगितले होते, अशा शब्दात राणेंनी अधिकाऱ्यांचा पाहुणचार घेतला.

Team Global News Marathi: