सरकारची कामे लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवा – मुख्यमंत्री

 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेली विकासकामे जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या आमदारांना दिले. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील आमदारांची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंचवीस आमदार, शिवसेनेचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आखलेल्या योजना व केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा. या कामांचा लोकांना फायदा करून द्या. राज्यात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे, सिंचन प्रकल्प, आरोग्य प्रकल्प व योजना राबवल्या आहेत. विकासकामे झाली आहेत. ही सर्व विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक मेहनत करा. शिवसेनेच्या आमदारांनी अधिक कार्यरत राहावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित केली होती. निवडणुका कधीही लागू देत, तुम्ही कामाला लागा असे आदेश या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले होते.

Team Global News Marathi: