“सरकार येत असतात, सरकार जात असतात.पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”

 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत टीका केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत यावरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाण साधला आहे. सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही”, असे म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र उगारले आहे.

भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, निधी अडवण्याच्या विरोधात काही नेत्यांनी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

राज्य सरकारने काही दिवसांआधी पुणे जिल्ह्यातील महाविकासआघाडी सरकारच्या काळातील ५० कोटींच्या विकासकामांना स्थगिती दिली असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारच्या आदेशानुसार स्थानिक निधी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे.

राज्य सरकारने ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या नाहीत, तसेच निविदा प्रक्रिया झाली मात्र काम सुरू करण्याचे आदेश नाहीत, अशी सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ग्रामीण विकास विभागाची महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे रद्द करण्याचे आदेशही सरकारने यापूर्वी दिले होते. राज्यात सत्तातरांची चाहूल लागताच महाविकासआघाडी सरकारने आपल्या आमदारांना जास्तीचा निधी देऊन ऐनवेळी कामे मंजूर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: